हरिश्चंद्रगड ट्रेक – भटक्यांची पंढरी | Harishchandragad Trek

एक स्वर्गीय अनुभव : हरिश्‍चंद्रगड ट्रेक

हरिश्चंद्रगड ट्रेक – भटक्यांची पंढरी

Table of Contents

किल्ल्याचा प्रकार – गिरिदुर्ग

डोंगररांग – कळसुबाई हरिश्चंद्रगड डोंगर रांग

श्रेणी – मध्यम

नमस्कार ट्रेकर्स मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अशा गडावर जो प्रत्येक ट्रेकर्स चे स्वप्न किंवा इच्छा असते तो गड म्हणजेच भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्रगडावर(Harishchandragad).

सह्याद्रीच्या कुशीमध्ये अनेक ट्रेकिंगची ठिकाणे आहेत. त्यात हरिश्चंद्रगड म्हणजे दुर्गवेड्यांचा अगदी ‘विक पॉईन्ट’.

हरिश्चंद्रगड हे लोकप्रिय ट्रेकिंगचे ठिकाण (Famouse Treking Destination) आहे ‘भटक्यांची पंढरी’ अशी ओळख असलेल्या या गडावर प्राचीन वास्तू कलेचे दर्शन घडविणारी देखणी मंदिरे, लेण्या, वैशिष्ट्यपूर्ण अशी भूरूपे आहेत, उंच उभे कडे, कातळ शिल्पे, दऱ्‍या, समृद्ध अशी वनसंपदा आहे.

हरिश्चंद्रगड हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात स्थित आहे. हा किल्ला /गड  अहमदनगर शहरापासून सुमारे १६० किलोमीटर अंतरावर पश्चिम घाटातील “कळसुबाई हरिश्चंद्रगड या डोंगर रांगांत” वसलेला आहे.

हरिश्चंद्रगडाची उंची १४२४ मीटर आहे. हरिश्चंद्रगड किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची ही सुमारे ४००० फूट इतकी आहे. हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असून अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळांपैकी एक महत्वाचे ठिकाण आहे.

निसर्ग सौंदर्य नटलेला आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला हा किल्ला आहे.

गडावर अनेक मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्यात अनेक देवता आणि महादेव मंदिराचा समावेश आहे, येथील महादेवाचे मंदिर १२ व्या शतकात बांधलेले आहे. हा किल्ला ट्रेकिंग, निसर्ग पर्यटन आणि रॉक क्लाइंबिंगचे उत्कृष्ट ठिकाण असून साहसी ट्रेकर्स साठी लोकप्रिय ठिकाण आहे.

हरिश्चंद्रगड ट्रेक सुरवात | Harishchandragad Trek Start

आपण हरिश्चंद्रगड ट्रेक हा सर्वात सोपी आणि प्रचलित असणाऱ्या वाटेने करणार आहोत…पाचनई  या पायथ्याच्या गावातून(ता.अकोले, जिल्हा अहिल्यानगर).

पाचनई गावातून थोडे पुढे चालत आल्यावर आपण गडाच्या पायथ्याशी पोहचतो. या ठिकाणी वन विभाग राजूर यांच्याद्वारे पर्यटक निवास बांधण्यात आलेले आहेत.

आपली वाहने पार्क करण्यासाठी प्रशस्त अशी पार्किंची सोयही वन विभागाद्वारे करण्यात आलेली आहे. या ठिकाणी अनेक हॉटेल्स, दुकान आणि पाण्याची एक विहीर आहे. राजूर ते पाचनई हि मुक्कामी बसही येथेच थांबलेली असते.

visitakole.com/Harishchandragad-Trek-Pachnai/ हरिश्चंद्रगड ट्रेक

या ठिकाणी आपल्या ट्रेकची सुरवात हि एका प्रवेश द्वारापासून होते.

हि पायवाट चांगलीच रुळलेली असून या वाटेने ट्रेकर्स आणि स्थानिक गुराख्यांची कायम ये-जा चालू असते. थोडे अंतर चालत गेल्यावर वाटेत खूप दगडे असून त्यातून चालत जावे लागते आणि हो येथे वाटेत दाट झाडी असल्याने ऊन लागत नाही. येथे अवघड जागांवर सुरक्षेसाठी आणि आधारासाठी लोखंडी रेलिंग लावलेले आहेत. हे अंतर चढून वर गेल्यावर आपण एका अनोख्या कपारीजवळ पोहचतो.

हरिश्चंद्रगड रेड बोलची कपार | Red Boll Rock

पाचनई गावातून हरिश्चंद्रगड ट्रेक करताना काही अंतर चालल्यावर आपण एका भव्य, उंच  कड्याच्या जवळ पोहचतो.

visitakole.com harishchandragad trek

गडावर जाणारी पायवाट हि या कपारीपासूनच पुढे जाते. या उंच कड्याच्या पायथ्याला कपारीत खडकांच्या दोन थरांमध्ये लाल-तांबड्या आणि हिरव्या रंगाचा खडक आणि राख आढळते. भूगोलात याला रेड बोल रॉक म्हणतात. या कपारीत माणूस बसू शकेल एवढी जागा आहे.

visitakole.com-red-boll-rock-harishchandragad trek

पावसाळ्यात अनेक धबधबे या मार्गने आपल्याला पाहायला मिळतात.

पुढे चालत गेल्यावर आपण एका मोठ्या ओढ्या जवळ पोहचतो. या ओढ्यात शिवरात्रीपर्यंत पाणी असते. पाणी वाहत असेल तर या ओढ्यात उतरण्याचे धाडस करू नये. हे पाणी खोल असुण पाण्याचा अंदाज येत नाही. इथे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. पाण्यात उतरण्याचे अति साहस कोणी करू नये.

visitakole.com Harishchandragad

पावसाळ्याच्या दिवसांत येथील  धबधबा हा पाहण्यासारखा असतो. या ओढ्यावर पुढे वन विभागाने पत्री पूल बांधलेला आहे . या पुढचा मार्ग दाट अरण्यातून जातो… आणि वाट काहीशी चढणीची आहे.. हा भाग पार करून वर गेल्यावर मंदिर परिसर दिसायला लागतो.

हरिश्चंद्रगड इतिहास | माहिती |  Harishchandragad History

हरिश्चंद्रगडाचा इतिहास हा कुतूहलजनक आहे आणि भूगोल हा विस्मयकारक असा आहे. इतर बहुतेक किल्ल्यांना मोगल किंवा मराठ्यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे, हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. या प्राचीन गडाला चारहीबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेले असून या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो.

१७४७ – ४८ च्या दरम्यान हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केल्याचा इतिहास आहे.

महाराष्ट्रातील इतर किल्ल्यानां आढळणारी तटबंदी या किल्यावर आढळत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत आणि साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील भगवान शंकर महादेवांचे मंदिर आहे. येथील हे महादेवाचे मंदिर स्थानिक आदिवासी लोकांचे कुल दैवत आहे. या गडाच्या चारही बाजूनी बहुतेक आदीवासी बहुल गावे आहेत. सह्याद्रितील अति दुर्गम किल्ला म्हणून ओळखला जातो.

हरिश्चंद्रगडावर जाण्याच्या वाटा | Harishchandragad Trek Route | Harishchandragad Trek Time

हरिश्चंद्रगड संपूर्ण फिरायचा असल्यास दोन ते तीन दिवसांचा निवांत वेळ हवा. गड फार मोठा असल्याने गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातून | Harishchandragad trek from Pacchnai

नगर जिल्ह्यातून हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत.

कोथळे गावातून | लव्हाळी गावातून | Kothale Village |  Lavhali

या दोन्ही गावातून हरिश्चंद्रगड ट्रेक करता येतो, आणि या दोन्ही गावातून ट्रेक केला तरी पुढे तोलार खिंडी जवळ दोन्ही मार्ग एकमेकांना मिळतात. राजूर ते कोथळे एकूण अंतर २१ किलो मीटर. राजूर ते लव्हाळी एकूण अंतर १९.५ किलो मीटर. लागणार वेळ ४५ मिनिटे.

पाचनई गाव मार्गे | Pacchnai Base Village Harishchandragad Trek

राजूर ते पाचनई हरिश्चंद्रगड पायथा एकूण अंतर २७ किलो मीटर. लागणार वेळ एक तास.

पाचनई गावातून हरिश्चंद्रगड ट्रेक केल्यास हरिश्चंद्रगड मंदिरापर्यंतचे अंतर ३ किलो मीटर असून पोहचण्यासाठी १ तास ते १.५ तासाचा वेळ लागतो. हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व वाटांपैकी पाचनई गावातून जाणारी वाट हि सर्वात प्रचलित, सोपी, आणि कमी वेळ लागणारी आहे. या मार्गाने अगदी वयस्कर व्यक्ती, लहान मुले अशा सर्वांसाठी हा मार्ग सोपा आणि सुरक्षित आहे.

राजूर ते पाचनई अशी एस. टी. महामंडळाची बस उपलब्ध असून ती राजूरहून संध्याकाळी ५.३० नंतर सुटते. खाजगी गाड्याही राजूरमधून उपलब्ध असतात.

खिरेश्वर गावातून, ता. जुन्नर, जिल्हा पुणे | Harishchandragad trek from Khireshwar

या मार्गे हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे किंवा  कल्याण -मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यावर उतरावे लागते. खुबी फाट्यावरून धरणावरून ५ कि.मी. अंतर चालत जावे लागते. पुढे खिरेश्वर गाव (पायथ्याचे गाव )लागते.

हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावाकडे जाताना काही  अंतर चालत गेल्यावर आपण खिरेश्वर या  प्राचीन  महादेवाच्या मंदिराजवळ  पोहचतो. हे मंदिर ‘नागेश्वराचे मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर अकराव्या शतका दरम्यनच्या यादव काळातील असून मंदिराच्या बाहेरील सभामंडपाच्या छत आणि दारावर अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत.

visitakole.com/khireswar-mahadev-mandir
photo credit by @dr_omkarvm95, @secret_temples for more

 

या गावातून दोन वाटा हरिश्चंद्रगडावर जातात.

पहिली वाट तोलार खिंडी मार्गे गडावर जाते. खिरेश्वर गाव ते टोलारखिंड पर्यंतचे अंतर पार करण्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो. या मार्गे  मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी ३ तासांचा वेळ लागतो.

दुसरी वाट ही कल्याण दरवाजा मार्गे गडावर जाते. ही वाट पूर्वी प्रचलित होती, सध्या  मात्र गाइड शिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्याने गडावर पोहचतो.

वाल्हीवरे गावातून, ता.मुरबाड, जिल्हा ठाणे | Harishchandragad trek from Belpada

या मार्गे हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी मोरोशी फाट्यावरून वाल्हीवरे गावाकडे येणाऱ्या रस्त्याने यावे. या गावात जेवणाची आणि मुक्कामाची सोय होऊ शकते. या गावातून हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत.

visitakole.com-Nalichi-Vat-Harishchandragad-Valhivare.

पहिला मार्ग हा नळीच्या वाटेने जातो आणि त्याच मार्गावरून दुसरी वाट माकड नाळेने गडावर जाते. नळीची वाट आणि माकड नाळ हे दोन्ही मार्ग फारच अवघड आहेत. या मार्गांनी हरिशचंद्र गडावर जायचे असेल तर ट्रेकिंगचे सर्व साहित्य आणि ट्रेक गाईड असल्याशिवाय या मार्गानी जाऊ नये. हे मार्ग खूप अवघड आणि धोकादायक आहेत.

तिसरा मार्ग केळेवाडी (वाल्हीवरे गावाची वाडी) मधून साधडे घाट मार्गे हरिश्चंद्रगडावर जातो. हा मार्ग सोपा आहे.

हरिश्चंद्रगडावर हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या गुहेत आणि गणेश लेणी आणि इतर लेण्यांत राहू शकतो. गडावर जेवणाची सोय उपलब्ध आहे आणि पाणी भरपूर  प्रमाणात उपलब्ध आहे.

खिरेश्वर मार्गे(पुणे) गडावर पोहचण्यासाठी ४ ते ५ तास लागतात.

वाल्हीवरे गावातून(ठाणे) गडावर पोहचण्यासाठी ५ ते ६ तास लागतात.

पाचनई मार्गे (अहमदनगर) १ ते दीड तास गडावर पोहचण्यासाठी लागतात. हा मार्ग सर्वात सोपा आणि जवळचा आहे. या मार्गे जर सकाळी ६ वाजता ट्रेक सुरु केला तर दिवस संपेपर्यंत संपूर्ण गड फिरून होतो.

(गडावर पोहचण्यासाठीचा वेळ हा ट्रेकर्सच्या वेगावर अवलंबून)

हरिचंद्रगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे | Places to Visit in Harishchandragad
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर | Harishchandragad Temple

visitakole.com Harishchandragad mandir

मंगळगंगेचा उगम | Mangalganga River

हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले आहे. रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडी गावातील अमृतेश्वराचे मंदिर हे ११ व्या शतका दरम्यान च्या काळात झांज राजाने १२ नद्यांच्या उगमस्थानी १२ शिवलिंगांचे मंदिरे बांधली त्यातिलाच एक हे मंगळगंगेच्या उगमस्थानी असणारे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर. या मंदिराची उंची अंदाजे १६ मीटर असेल. काळ्या पाषाणात हे मंदिर बांधलेले आहे. मंदिराला दोन द्वारे आहेत.

मंदिराच्या समोर कातळाची भिंत असून या भिंती समोर एक लहानसा दगडी पूल आहे. तारामती शिखरावरून वाहत येणाऱ्या ओढ्याचे पाणी  या पुला खालून वाहते. हा ओढा म्हणजेच मंगळगंगेच पात्र आहे. या मंगळगंगेच्या पात्राला पावसाळ्यातच पाणी वाहत असते. मंदिराच्या डाव्या बाजूला बाहेरच्या बाजूने श्री गणेशाचे सुंदर शिल्प आहे. येथे बाजूलाच कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. मंदिराच्या आसपासच्या परिसरात बऱ्याच गुहा आहेत. या गुहा मुकामासाठी योग्य आहेत.

हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या मागील बाजूला एक गुहा आहे. या गुहेमध्ये मोठा दगड / शिळा असून या शिळे खाली एक मोठी खोली आहे. या खोलीच्या दरवाजाला एक मोठी शिळा लावून ही बंद करण्यात आलेली आहे. या खोलीत बसून श्री. चांगदेव ऋषींनी तब्बल १४ वर्ष तप केल्याचे सांगितले जाते.

“शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥

हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥

हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।

ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥

जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥”

हे चांगदेव ऋषीं विषयीचे शीला लेख मंदिराच्या परिसरातील शिळांवर, खांबावर, भिंतीवर असल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात. श्री. चांगदेवांनी या ठिकाणी  तप करून ‘तत्वसार’ नावाचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला होता.

एका शिलालेखावर “चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥” लिहिलेले असून ते वाचता येते.

भाग २ लवकरच …पुष्करणी । तारामती । गणेश गुहा । हरिश्चंद्रगड कोकणकडा

Leave a Comment

error: Content is protected !!